"व्यक्तीच्या विकासाशिवाय आपण विश्व घडवू शकत नाही.. म्हणूनच हे ध्येय ठेवून आपल्याला सदैव प्रयास करत राहणे आवश्यक आहे. मानवतेप्रति आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. ज्यासाठी आपण सर्वाधिक उपयोगी पडू शकतो, त्यांच्याप्रति आपले कर्तव्य महत्त्वपूर्ण असते."

-मॅडम क्युरी 


वारसा (पोलंड) येथे ७ नोव्हेंबर १८६७ साली जन्मलेली मेरी स्क्लोडोत्स्का म्हणजेच मॅडम क्युरी भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या होत्या. त्यांना रसायन शास्त्रातही नोबेल पुरस्कार मिळाला आहे. दोन नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती होत्या. त्या रेडिओ अॅक्टिव्हिटी शोधासाठी संशोधक म्हणून ख्यातनाम झाल्या. त्याच्या वैज्ञानिक पतीच्या मृत्यूनंतर सरकारी पेन्शन स्वीकारण्याऐवजी पॅरिस विश्वविद्यालयात प्रोफेसर पदावर काम करण्यास सुरुवात केली. त्या एकट्या अशा नोबेल विजेत्या आहेत ज्यांच्या दोन्ही मुलींनादेखील नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

मेरीची स्मरणशक्ती विलक्षण होती. त्या मित्रमैत्रिणीमध्ये 'मान्या' नावाने लोकप्रिय होत्या. १६ वर्षांची असताना त्यांना हायर सेकंडरीत मिळाले होते. त्यांचे आईवडील शिक्षक होते. मेरी ११ वर्षांच्या असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला.

आर्थिक तंगीमुळे मेरीने काही काळ शिकविण्याचे काम केले. एका घरात गव्हनेसच काम केले. तिथेच त्यांना आयुष्यातील पहिल्या प्रेमाचा अनुभव आला. जो दुर्भाग्याने अयशस्वी ठरल्याने मेरीला मानसिक त्रास सहन करावा लागला.

पॅरिस येथे चिकित्सा विज्ञानात शिक्षण घेणारी बहीण ब्रोनियाला त्या पैसे पाठवत. १८९१ साली पुढील शिक्षणासाठी त्या पॅरिस येथे गेल्या. वाईट दिवसांत ब्रेड, बटर आणि चहाच्या आधारे त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. १८९४ साली त्यांनी प्रयोगशाळेत काम करण्यास प्रारंभ केला.

वैज्ञानिक प्रयोगादरम्यान प्रयोगशाळेत अजून एक प्रयोग झाला. मेरीची भेट पियरेसह होऊन प्रेमाच्या नवीन अध्यायाला सुरुवात झाली. १८९५ साली प्रेमाचे तम्नात रूपांतर झाले. १८९८ साली या वैज्ञानिक दांपत्याने पोलोनियमचा शोध लावला. काही महिन्यांनंतर रेडिअमचाही शोध लावला. चिकित्सा विज्ञानासाठी आणि रुग्णांच्या उपचारांसाठी हा शोध महत्त्वाचा ठरला.

१९०३ साली मेरी क्युरीने पीएच. डी केली. १९०३ साली या दांपत्यास रेडिओ अॅक्टिव्हिटीतल्या शोधासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला. या वैज्ञानिक स्त्रीसाठी मातृत्वाचाही अनुभव खूप प्रेरणादायी ठरला. त्यांनी दोन मुलींना जन्म दिला. १८९७ साली आइरिन तर १९०४ साली ईव्ह! मेरीचे म्हणणे होते, 'संशोधन कार्य आणि घर-मुलांची जबाबदारी एकत्रित सांभाळणे सोपी गोष्ट नाही,' पण त्यांनी प्रयत्नपूर्वक या परिस्थितीशी जुळवून घेतले..

या दरम्यान रस्त्यांवर झालेल्या दुर्घटनेत त्यांचे पती वैज्ञानिक पियरे क्युरी यांचे निधन झाले. पुढे पतीच्या सर्व अर्धवट राहिलेल्या कामांची जबाबदारी मेरीने स्वत:वर घेतली.

१९११ साली रसायनशास्त्रातील रेडिअम शुद्धिकरणासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान मेरीने आपल्या मोठ्या मुलीच्या सहकार्याने 'एक्स-रेडिओग्राफी'चा प्रयोग विकसित करण्याचे कार्य केले.

१९३२ सालापर्यंत पॅरिस येथे क्युरी फाउंडेशनची स्थापना यशस्वी केली. तिथे त्यांची बहिण ब्रोनियाला संचालक केले गेले. १९३४ साली मेरी क्युरीचे रेडिएशनच्या प्रभावामुळे निधन झाले.