आपला महाराष्ट्र संत संस्कृतीच्या भक्कम आधारावरच उभा आहे. महाराष्ट्राची संतपरंपरा भागवत धर्माची स्थापना करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांपासून सुरू होते. नामदेव, तुकाराम, तुकड्यादास, गाडगेबाबा अशी ही साखळी आहे तुकाराम महाराजांनी रंजल्यागांजल्याच्या रूपाने जो विठ्ठल अनुभवला, तोच गाडगेबाबांनीही अनुभवला. समाज जीवनातील सर्व प्रकारची विषमता नष्ट करण्याचा त्यांनी विडा उचलला होता. म्हणून त्यांना 'दलितांचा कैवारी' असेही म्हटले जाते. सर्व वैदर्भीय संतांमध्ये गाडगेबाबांचा कर्मयोग सर्वश्रेष्ठ दर्जाचा समजला जातो.

संत गाडगेबाबांचा जन्म दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव येथे २३ मार्च १८७६ रोजी मागासवर्गीय परीट समाजात झाला. दारूने कुटुंबाचा विनाश कसा होतो, हे त्यांनी घरातच लहाणपणापासून अनुभवले होते. वडिलांच्या निधनानंतर ते मामाकडे गेले, पण तिथेही त्यांना दु:खाशीच सामना करावा लागला त्यांच्या बालवयातच पाठीशी संसार लागला होता. परंतु तुकारामाचा आदर्श समोर ठेवणाऱ्या गाडगेबाबंनी संसाराकडे पाठ फिरवून विश्व निर्मात्याचा शोध घेणे सुरू केले. त्या भ्रमंतीच्या काळात विद्यमान समाजाची दुरवस्था, दैन्य, विषमता त्यांना अस्वस्थ करून गेली. ईश्वराचा शोध घेताना आलेल्या आत्मामुभूतीमुळेच बाबा जनमानसात संतविभूती म्हणून परिचित झाले समाजातील सर्व जाती-जमातींना सुखासमाधानाने, बंधुभावाने जगता यावे हा ध्यास त्यांनी आजीवन घेतला होता. स्वतः व्रतस्थ राहून त्यांनी समाजाला अन्नदान, वस्त्रदान दिले, पददलितांना सहानुभूती दिली, एवढेच नव्हे तर सहानुभूतीचा नवा धर्मच त्यांनी समाजाला शिकविला.गाडगेबाबांचा देव मंदिर, मसजिद, पूजापाठ ह्यांत नसून तो दुःखीदीनांच्या हृदयात, त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यात, त्यांच्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करण्यात होता. बाबांना पुस्तकी शिक्षण नसले तरी त्यापलीकडचे माणुसकीचे आविष्कार करण्याचे शिक्षण जन्मजातच मिळाले होते. 'शिवभावे जीवसेवा' हेच तत्त्व त्यांनी अंगीकारले होते. हिंदुधर्मात असलेली अस्पृश्यता, धर्माच्या नावाखाली चालणारी पशुहत्या, गरीब श्रीमंत ह्यांचे परस्पर विरोधी केविलवाणे दर्शन त्यांना अस्वस्थ करीत होते.

'आधी केले मग सांगितले' ह्या तत्त्वानुसार त्यांनी गाव स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली. गावोगावी जायचे, स्वतःच गाव स्वच्छ करायचे व त्याच जागी कीर्तनाला उभे राहायचे, असा सपाटा त्यांनी सुरू केला. गाडगे महाराज दगडांचे टाळ करून कीर्तन करायचे. लोक आपोआप जमा व्हायचे. लोक कीर्तनात रंगले की बाबा प्रश्नांचा भडिमार सुरू करायचे. त्यांच्या चुका त्यांना दाखवून द्यायचे कीर्तनाचा विषय सामाजिकच असायचा. अंधश्रद्धेवर आघात करताना, "तुम्ही देवीला बळी देता का नाही? मंग मसाला वाटून खाता का नाही? तुम्ही अंगारे, धुपारे करता का नाही? दारू पिऊन घरी येता का नाही? बायकोले लाथाबुक्क्यांनी मारता का नाही? सावकाराकडून दीडदुपटीने कर्ज घेता का नाही? घर गहाण टाकता का नाही?" असे विविध प्रश्न विचारायचे लोकांनी मग "होऽऽ" म्हटलं की मग त्यांची चूक लक्षात आणून द्यायची असे प्रश्नोत्तराचे कीर्तन बाबा करीत असत. त्यांच्या या जनजागृतीच्या कार्यक्रमाला समाजाचा भरपूर प्रतिसाद मिळत. त्यांच्या कीर्तनात कुणाचीही दयामाया न करता परखडपणे दोषदिग्दर्शन केले जायचे. "बाया हो! नाकात नथ घालूनमसाला वाटता, नळ्या ओरपू ओरपू रस्सा खाता, तुम्ही कोंबडे, बकरे कापता, त्यापरीस आपली लेकरं देवापुढे का वा कापत नाही ?" असा सवाल उठवून प्रसंगी शिव्याशाप देऊन त्यांनी अंधश्रद्धेवर कठोर आघात केले. 'गोपाला गोपाला देवकिनंदन गोपाला' ह्या भजनाद्वारे त्यांनी माणसातले हरवलेले माणूसपण प्रकट करण्याचे प्रयत्न केले होते.

डोक्यावर खापर आणि हातावर भाकर घेऊन त्यांनी आंतरिक कळवळ्याने माणुसकीचा एक नवा धर्म समाजाला शिकविला. ते स्वतः शिकलेले नसले तरी शिक्षणाची महती त्यांनी त्या काळच्या अज्ञ समाजाल पटवून दिली. त्यामुळेच दगडातला देव माणसात स्थिरावू शकला. भूतदयेच्या व्रतातून त्यांनी भिकाऱ्यांना अत्रदान करण्यास अन्नछत्रे उघडली, गरिबांच्या मुलांना फुकट शिक्षण देण्यासाठी शाळा चालविल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोफत धर्मशाळा काढून लक्षावधींना निवारा दिला.

स्त्रियांनी व मुलींनी शिकलेच पाहिजे, त्याशिवाय कुटुंब सुखी होणार नाही अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच की काय बहुजन समाजासाठी शाळा, कॉलेजे काढणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख ऊर्फ भाऊसाहेबांना ते ईश्वरासमान मानीत असत. डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.. पंजाबराव देशमुख अशी थोर मंडळी सामान्य वाटणाऱ्या बाबांचे जिवलग बनले होते. त्यांचा मानवतावादी, समाजवादी दृष्टिकोन बाबांनी अंगीरकारला होता. त्यामुळे बाबा 'कर्मयोगी' ठरले होते. “घरावरच्या टिना इका पन पोरायले शिकवा" असे त्यांचे आग्रहाचे प्रबोधन असे. 'बापहो, दारू सोडा' असे कळकळीचे आवाहन असे. आज गाडगेबाबांच्या समाजकार्याला, जनजागृतीला शासनमान्यतामिळाली आहे. त्यांच्या नावावर महाराष्ट्र शासनातर्फे 'ग्रामस्वच्छता अभियान राबविले जात आहे. तसेच अमरावती विद्यापीठाला गाडगेबाबांचे नाव दिले गेले आहे हातावर खाणे, उघड्यावर झोपणे असे जीवन जगणाऱ्या गाडगेबाबांनी भुकेल्यांना अत्र, तहानलेल्यांना पाणी बेकारांना रोजगार उघड्यांना वस्त्र, मुक्या प्राण्यांना अभय गरीब मुलामुलींना शिक्षण, बेघरांना घर, आजाऱ्यांना औषधोपचार, गरीब मुलामुलींची लग्ने अशी मदत करण्याचा संदेश समाजाला दिला. हाच त्यांचा अखेरचा संदेश ठरला. अशा ह्या कर्मयोगी संताची जीवनज्योत २० डिसेंबर १९५६ ला मावळली. गाडगेबाबा म्हणजे जीवन चैतन्यमय ज्योती प्रकाश! या कर्मयोग्याला शतकोटी प्रणाम!

चरित्ररेखा सौ. कल्पना देशमुख

लल्लेश्वरी

प्रसिद्ध काश्मिरी संत लाडेश्वरी ( १३१७-१३७२) हिला अगदी लहान वयातच ईश्वर साक्षात्कार झाला होता. तिच्याबद्दल अनेक दंतकथा आणि चमत्कार सांगितले जातात. ईश्वर साक्षात्काराच्या मार्गावर प्रगती होण्यासाठी तिने पुढील गोष्टींची आवश्यकता सांगितलेली आहे. त्या गोष्टी म्हणजे ईश्वराविषयों उत्कट प्रेम, धनदौलत, संपत्ती व कौटुंबिक बंधनांचा त्याग आणि जातपात, वंश अशा इंद्वांपासून मुक्ती. तिच्या उपदेशांमध्ये ती म्हणते.

जरि शिव वसतो सर्व चराचरात मग भेद का हिन्दु-मुसलमानात ॥ जर तू ज्ञानी मग ओळख तू कोण ते सत्य शिवाचे ज्ञानच हे जाण ॥ त्यागिली जनी धूर्तता कपट लवाडी पाहता त्या 'एका' मनी वाढविली गोडी ॥ मग भेद कशी करू याच्या आणि त्याच्यात । अन् कसे अन्न अव्हेरू आलेले मज पुढ्यात ।।