भारताच्या त्रिमुर्ती या राजचिन्हाच्या खाली ’सत्यमेव जयते’ हे वाक्य अंकित केले आहे. या संस्कृत वाक्याचा अर्थ सांगितला जातो, ’सत्याचा विजय होतो’ असा. इंग्रजीमध्ये ’टृथ प्रिव्हेल्स’ असा आहे. या संस्कृत वचनात सत्य आणि जय हे दोन शब्द आहेत. सत्य हे नाम आहे आणि जयचा क्रियापद म्हणून उपयोग केलेला आहे.

सत्य म्हणजे काय? सत्य भूतकाळात असतं कारण ’एखादी घटना घडली’, हे सत्य ती घटना घडल्यावरच अस्तित्वात येते.

वर्तमानात सत्य घडत असतं. सत्याचा भविष्यकाळाशी काही संबंध नसतो कारण जे घडलंच नाही ते सत्य कसे काय असू शकते?

आपण कथा/कादंबऱ्या, नाटक/सिनेमांमध्ये ’माझी सत्याची बाजू आहे म्हणून माझाच विजय होणार’, अशा प्रकारचे संवाद वाचले/ऐकले आहेत. ’सत्याची बाजू’ म्हणजे काय? गेल्या वर्षी भारताने क्रिकेटचा ’वर्ल्ड कप’ जिंकला, हे सत्य आहे पण म्हणून त्यानंतरच्या सर्व मॅचेस भारत जिंकेल, असे नाही. आम्ही ’चॅम्पिअन’ आहोत म्हणून आम्ही जिंकणार, असे होणाऱ्या मॅचच्या आधी म्हणणे, हा विश्वासाचा भाग असू शकतो पण त्या म्हणण्याचा घडणाऱ्या सत्याशी काहीही संबंध नसतो.

न्यायपालिका पुराव्यावर चालते. पुराव्याअभावी सत्य असत्यात परिवर्तित होऊ शकते.

सत्यमेव जयतेचा खरा अर्थ आहे ’जे जिंकतं ते सत्य आहे’. ’जो जिता वोही सिकंदर’ या म्हणीच्च्या अर्थाशी जुळणारं हे संस्कृत वचन आहे. इंग्रजीमध्ये होईल ’व्हॉट प्रिव्हेल्स इज द टृथ’.

काही घटना पुन:पुन्हा तशाच प्रकारे घडतात. सूर्य पूर्वेला उगवतो. रात्री साडेनऊ वाजता मराठी बातम्या प्रसारित होतात. वगैरे!

सूर्याचं पहाना! तो दररोज बरोब्बर पूर्वेला उगवत नाही, हे वैज्ञानिक ’सत्य’ आहे. उत्तर भारतातच काय पण मकरवृत्ताच्या उत्तरेला राहणाऱ्या जगातल्या सर्वच लोकांसाठी सूर्य पूर्वेच्या दक्षिणेकडे उगवतो. धृव तारा उत्तर दिशेला दिसतो, हे फक्त पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सत्य आहे. मॉन्सूनचा पाऊस महाराष्ट्रात नैऋत्येकडून येतो. तर बिहारमध्ये त्यालाच ’पुरवय्या’ म्हणजे पूर्वेकडून येणारा म्हंटले जाते. तमिलनाडूमध्ये तर हिवाळी मौसमी पाऊस इशान्येकडून येतो. भुगोलामुळे सत्य कसे बदलते, त्याची ही उदाहरणे आहेत.

चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे सत्यसुद्धा मानवाला आत्ता आत्तापर्यंत माहित नव्हते. ठोकळ मानाने निसर्गही नियमात बांधलेला असतो, हे सत्य आहे. नियमांना अपवाद असतात पण म्हणून सत्य असत्य होत नाही.

सूर्याचा प्रकाश कमी होऊ लागला की संध्याकाळ होते, या सवयीमुळे खग्रास सूर्यग्रहणात पक्षी घरट्याकडे परततांना दिसतात. अशाच समजुतीचा फायदा श्रीकृष्णाने अर्जुनाला वाचविण्यासाठी केल्याचे आपल्याला माहित असेलच.

थोडक्यात म्हणजे ’सत्य’ विशिष्ट संदर्भात सत्य असतं, हे लक्षात ठेवले पाहिजे. सत्याचा कीस काढत गेलो तर हाती भुगाच मिळणार, नाही का!